चिताभस्म भाग 8

#चिताभस्म भाग 8
पूर्वार्ध 
त्या व्यक्तीला नमस्कार करून अर्जुनच्या वडिलांनी सगळ्यांना वाड्याच्या आत मध्ये घेतलं. एव्हाना बाकी सगळ्यांना जाग आली होती. 
मुलं आता काहीशी सावरली होती. 
पण सगळ्या मोठ्यांच्या मनात एकच प्रश्न होता....हे नेमके हरवले कोठे होते? कारण टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ओसाड माळरान होतं. एकही गाव नव्हतं.....
मग हा माणूस नेमका होता तरी कोण? 

आता पुढे...

काही वेळाने सावरल्यानंतर अर्जुनच्या वडिलांनी चहापाणी झाल्यावर सगळ्यांवरून नजर फिरवली. आणि मग त्या व्यक्तीकडे पहात ते म्हणाले, " भाऊ तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या लेकरांना आमच्यापर्यंत सुखरूपपणे आणलत. पोरं जेव्हापासून हरवली होती आम्हाला कुणाला तर काहीच समजत नव्हतं. सगळं काही वरच्याच्या भरवशावर सोडून दिलं होतं आम्ही. पण तुम्ही त्याच्या रूपातच आलात आणि आम्हाला आमची पिल्लं पुन्हा दिसली. " 

" आभार कसले मानताय. ते माझं कर्तव्यच होतं. म्हणजे तुम्ही त्याच्या भरवशावर सोडून दिलं होतं ना? मग त्याच्या वतीने कुणीतरी त्याचं काम पूर्ण करणं सुद्धा गरजेचं होतं. होय की नाही? ते काम माझ्या वाट्याला आलं इतकच." तो माणूस म्हणाला. 

" बरोबर आहे तुमचं. आता बाकी सगळं आपण नंतर बोलूया. तोपर्यंत सगळ्यांनी आराम करा. चला पाहुणे मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो." असं म्हणत अर्जुनच्या वडिलांनी त्या व्यक्तीला आतल्या दिशेने येण्याचा इशारा केला. 

" नाही, मी परत जातो. मी थांबू नाही शकत. मला अजून काही काम करायची आहेत.", ती व्यक्ती काहीशी चाचरत म्हणाली.

" असं कसं? तुम्ही आमची एवढी मदत केली. मग निदान आमचा थोडा पाहुणचार तरी घेऊन जा. फार वेळ लागणार नाही. आम्ही सगळे आता जागेच आहोत." चिनूचे बाबा सुद्धा स्वतःहून म्हणाले. 

" ठीक आहे. तुम्ही म्हणता तर थांबतो मी. पण मी शेतकरी माणूस... मला आता उठल्यानंतर परत झोपण्याची सवय नाही. त्यामुळे मी बाहेर ओसरीवर उन्हात बसतो. ", असं म्हणून तो बाहेर बसण्यासाठी निघून गेला. 

बाकीचे सर्वजण त्यांच्या कामाला लागले. चिनू मात्र सगळं आवरून लगेच धावत बाहेर आली. आणि त्या व्यक्तीजवळ जाऊन बसली. 

ती बराच वेळ त्यांचं एकटक निरीक्षण करत होती. ते मात्र डोळे मिटून विठ्ठलाचे नाव घेण्यात मग्न होते. काही क्षणानंतर त्यांना जाणीव झाली की कोणीतरी आपल्याला एकटक पाहत आहे. 
" काय ग चिमणे? तू माझं एवढं निरीक्षण का करत आहेस?" , त्यांनी न राहून चीनूला विचारलं. 

" बाबा, तुम्ही काल निघताना काय म्हणत होतात? विधी लिखित आहे, घडणार घडतच, मी तर वाटाड्या आहे.... असं काहीतरी मी ऐकलं.", चिनू डोळे बारीक करून त्यांच्याकडे बघत म्हणाली. जणू काही ती त्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती. 

" हुशार आहेस की.... मला वाटलं शहरात राहून तुझ्या मेंदूला गंज चढला की काय? हा हा हा.... अग चेष्टा केली... हे बघ ह्या जगात कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. सगळी त्या विठ्ठलाची लीला. आपल्याला वाटतं की तो कमरेवर हात ठेवून, डोळे मिटून, विटेवर उभा आहे.... आणि त्याचं आपल्याकडे लक्ष नाही... पण असं नसतं ग... त्याचं सगळीकडे लक्ष असतं. तुझ्यासारख्या खास लोकांकडे तर जास्तच लक्ष असतं... मी तुला एक सिक्रेट सांगतो बर का? पण आधी मला खात्री दे की तू हे सिक्रेट वेळ आल्याशिवाय कोणालाही सांगणार नाहीस... तुम्ही मुलं काय म्हणतात ते हा प्रॉमिस... प्रॉमिस कर मला.", आपला हात पुढे करत ते म्हणाले. 

क्षणाचाही वेळ वाया न घालवता चीनूने त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, "प्रॉमिस... मी वेळ आल्याशिवाय कुणालाही हे सिक्रेट सांगणार नाही. पण हे सिक्रेट सांगायची वेळ आली आहे हे मला कसं कळेल?", तिने तिच्या बालसुलभ बुद्धीने प्रश्न विचारला. 

" कळेल.... कळेल.... वेळ आली आहे हे सुद्धा कळेल आणि कुणाला ते सिक्रेट सांगायचं आहे ती व्यक्ती सुद्धा आपण होऊन तुझ्या समोर येईल. आणि ही तीच व्यक्ती आहे हे सुद्धा तुझ्या लक्षात येईल. मी आत्ताच तुला सांगितलं ना सगळं काही...", 
त्यांनी काही क्षणांपूर्वीच तिच्याकडून ज्या गोष्टीसाठी प्रॉमिस घेतलं होतं ती गोष्ट तिला सांगितली होती. ते ऐकल्यानंतर तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. पण तिच्या वयाकडे पाहता त्यांना दिला सध्या तरी त्या गोष्टीचा विसर पडावा असं वाटत होतं. म्हणूनच ते तिला शब्दांमध्ये गुंतवत होते. 

" तो विठ्ठल ठरवत असतो... कळलं हो मला... पण तरीही मला एक प्रश्न पडला आहे.... तुम्हाला कसं माहित की मी आणि अर्जुन वरून खाली पडताना तिथे अडकलो आहोत ते??? तुम्हाला कसं कळलं?", चिनू ने हुशारी केलीच. 

" हे बघ चिमणे, मला तुझी मदत करायची होती मी केली. आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात भविष्यात कधीतरी मी पुन्हा एकदा तुला भेटेन. पण तोपर्यंत तुला माझी आठवण येणार नाही. जसं तुझं ते सिक्रेट तुझ्या सुप्त मनात दडून गेलं आहे, तसाच मी सुद्धा त्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दडून बसणार आहे. तुझं बालपण, तुझी निरागसता हरवू नये म्हणून या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ", एवढं बोलून त्यांनी तिच्या डोळ्यांवरून आपला हात असा काही फिरवला की चिनूला प्रचंड झोप येऊ लागली. 

ती त्यांच्या शेजारून उठली आणि सरळ आतल्या खोलीत जाऊन झोपली. 

थोड्या वेळानंतर सगळ्या कुटुंबाबरोबर काही वेळ घालवून ते त्यांचा निरोप घेऊन निघून गेले. चिनू तेव्हा जागी नव्हती. आणि ते त्यांच्यासाठी योग्यच ठरणार होतं. कारण आता तिच्या मन:पटलावर असणाऱ्या त्यांच्या स्मृती धूसर होणार होत्या. 

ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर घराच्या ओसरीवर मात्र बराच काळ जाणवणारा ओळखीचा चंदनी सुगंध दरवळत होता. घरातल्या सगळ्या मोठ्या व्यक्तींना ते जाणवत असलं तरी उघड उघडपणे ते मान्य करण्याची हिम्मत कोणातच नव्हती. 

ही घटना घडल्यानंतर चीनचे कुटुंब त्याच दिवशी आपल्या घरी परत आले. आणि त्यानंतर कोणीही त्या घटनेचा फारसा उल्लेख घरात केला नाही. एकतर चिनूला काहीच आठवत नव्हतं.... आणि दुसरी गोष्ट तिला आणि अर्जुनला घरी घेऊन आलेल्या व्यक्तीने मुलांना त्या गोष्टीची आठवण करून द्यायची नाही असं निक्षून सांगितलं होतं. 

कुठल्याही आई-वडिलांना आपल्या मुलांचं भविष्य प्रचंड प्रिय असतं. आणि त्याचमुळे चिनू आणि अर्जुनच्या आई-वडिलांनी ही घटना जणू कधी घडलीच नव्हती अशा पद्धतीने वागायला सुरुवात केली होती. 

पण त्यांना एक गोष्ट माहित नव्हती, या जगात कारणाशिवाय काहीही घडत नाही...😉
आणि प्रत्येक गोष्टी घडण्यामागे ज्याची इच्छा असते तो आज ना उद्या सगळ्या कड्या व्यवस्थित जुळवून आणणार होता. मग कोणाची इच्छा असो किंवा नसो...
शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माचा भार ज्याच्या त्याच्या ओंजळीत टाकणं हे त्याचं सगळ्यात आवडतं काम होतं... 

चिनूचे सुरू झालेले सेशन हा त्याच नव्याने घडणाऱ्या गोष्टींचा पाया होते... जे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींना पुन्हा समोर येण्यासाठी कारण देणार होते...

जिथे चिनूला सगळं सोपं करायचं होतं तिथे कोणीतरी ह्या गोष्टी अजून अवघड करण्यासाठी प्रयत्न करत होतं...
प्रत्येकाला आपला डाव खेळायची संधी मिळणार होती... पण अर्थातच कोणाच्या सोंगटीला काय दान पडणार हे सुद्धा ठरलेलंच होतं...
मग कोणी म्हणेल खेळायचचं कशाला??? 
याचे उत्तर खूप सोपं आहे... काय घडणार आहे हे "त्या" ला माहित आहे खेळणाऱ्याला नाही.... त्यामुळे प्रत्येक खेळाडूला असं वाटणार की खेळ मीच जिंकणार आहे.... आणि त्याला त्या भ्रमात ठेवणं हेच त्यावर बसलेल्याच्या अस्तित्वाची खूण आहे. 

बाकी? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 
क्रमशः 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिताभस्म भाग 6

चक्रव्यूह भाग 5

चक्रव्यूह भाग 11