चिताभस्म भाग 6
#चिताभस्म भाग 6
पूर्वार्ध
" काय लिहून ठेवलं आहे या पोरीच्या नशिबात काय माहित?", असं म्हणत आजी स्वयंपाक घराच्या दिशेने वळाल्या.
" असं नको म्हणूस, तिचं नशीब आणि भविष्य दोन्ही खूप चांगलं असणार आहे. देव प्रत्येकालाच आपला हिशोब पूर्ण करायची संधी देत नाही हे लक्षात ठेव. पण तिला ती संधी मिळणार आहे. आणि जेव्हा ती संधी मिळेल तेव्हा ते बघण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं एवढीच प्रार्थना कर. " , आजोबा म्हणाले.
" खरं आहे तुमचं, मी सुद्धा मनोमन त्याच दिवसाची वाट पाहत आहे.", आजी भिंतीवर असलेल्या त्या फोटोंकडे पाहत म्हणाल्या.
चिनू, देसाई कुटुंबातली महत्त्वाची व्यक्ती...
आता पुढे
चिन्मयी, डॉ कडे जाऊन आल्यापासून तशी शांतच होती. आजच सेशन तिला हवं तसं झालं नव्हतं. आजच्या सेशनमध्ये तिने जे काही बघितलं होतं त्यापैकी फार कमी माहिती डॉक्टर काकांना सांगितली होती. तिने असं का केलं होतं हेच तिला कळत नव्हतं.
शेवटी त्या विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी तिने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या डायरीमध्ये आजच्या सेशन बद्दल लिहायला सुरुवात केली. लिहिता लिहिता तिला अजून काही गोष्टी आठवल्या त्या सुद्धा तिने तिथे नोंदवून ठेवल्या. हे सगळं झाल्यावर आपल्या डायरीचा एक फोटो काढून तिने त्याला व्हाट्सअप वर पाठवून दिला.
ब्लू टीक झाल्यानंतर पाचव्या मिनिटात त्याचा फोन आला.
" हाय ढापणे तू काय करतीयेस? इतक्या रात्री जागी कशी?" त्याने विचारलं.
" तुला कधीच माझ्याशी सरळ बोलता येणार नाही का रे? मी तुला जे पाठवलं ते तू बघितलं आणि वाचलं सुद्धा हे तुझा फोन आला त्यावरून मला लक्षात आलं आहे. माझी मनस्थिती काय आहे याचा अंदाज असताना सुद्धा तू मस्करी करत बसला आहेस? मी मूर्ख आहे का की इतर सगळ्यांना सोडून माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुला एकट्याला सांगते?" तिने जरा वैतागतच त्याच्यावर तोफ डागली.
" सॉरी, मला वाटलं तू आता ओके झाली असशील. आय नो तुला बोलायचं आहे आणि म्हणूनच मी तुला फोन केला. मला एक सांग तू बाबांना सगळं का नाही सांगितलं?" त्याने विचारलं.
येस बाबांना म्हणजे चिन्मयीची ट्रीटमेंट जे डॉक्टर करत आहेत त्यांचाच हा मुलगा आहे. जो चिन्मयीचा खूप खास मित्र आहे. आता त्यांची मैत्री किती खास आहे ते आपल्याला हळूहळू कळेलच तोपर्यंत जरा धीर धरा.
तर चिन्मयचा मित्र म्हणजे सुमेध ... सुमेध स्वतः त्याच्या वडिलांप्रमाणे एमडी होता. पण सध्या तो एका वेगळ्या विषयावर रिसर्च करण्यासाठी भारताबाहेर गेलेला होता. चिन्मयीपेक्षा चार वर्षांनी मोठा असला तरी त्या दोघांचं नातं खूप छान होतं. चिन्मयी जशी त्याला सगळं काही सांगायचे तसंच तो सुद्धा तिच्या सोबत प्रत्येक गोष्ट डिस्कस करायचा.
आत्तासुद्धा तो इथे नसल्यामुळे चिन्मयी त्याच्या बाबांसोबत सेशन करत होती. नाहीतर तिची केस पहिल्यापासून तोच हँडल करत होता. त्यामुळे इतरांपेक्षा त्याला तिच्या बाबतीत काही जास्त गोष्टी माहित होत्या.
" तुला माहित आहे ना मी जर काकांना सगळं सांगितलं असतं तर त्यांनी ते लगेचच बाकीच्यांच्या कानावर घातलं असतं. आणि मग घरातलं वातावरण अजूनच टेन्स झालं असतं. मला ऑलरेडी हा सगळा ताण झोपत नाही रे... हे सगळं जाणून घेऊन तसंही काय फरक पडणार आहे? पण आजी आजोबांना बरं वाटावं म्हणून मी हे सगळं सहन करत आहे. बरं तू मला सांग या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय होतो?" आता तिचा आवाज रडवेला झाला होता.
" हे बघ चिनू, आपण हे सगळं कोणाला धडा शिकवण्यासाठी करत नाही आहोत. तुला त्या सगळ्या गोष्टींपासून मोकळं करावं म्हणून करत आहोत. तुला मोकळेपणाने, तुझं काम करता यावं म्हणून हे सगळं चाललं आहे हे लक्षात घे. तू जरी कितीही म्हणालीस की मला काहीही आठवत नाही तरी तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात त्या गोष्टी साठवलेल्या आहेत. ज्या वेळोवेळी डोकं वर काढतात. आणि मग तुझ्या मनाचा तळ ढवळून निघाल्यामुळे तुझं रोजचं आयुष्य डिस्टर्ब होतं. तूच सांगितलंस ना की कधी कधी तुझ्या तोंडून निघून जाणारी वाक्य आजी-आजोबांना आश्चर्यचकित करतात म्हणून? " तो तिला समजावण्याच्या सुरात बोलत होता.
" खरंच आहे रे ते! मी काय ते स्वतःहून करते का? त्यातले काही शब्द तर मी कधीच ऐकले नव्हते. आणि जसं जसं मी ऐकून खोलवर जाऊन गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करते आहे. तसं तसं मला स्वतःबद्दलच काही गोष्टी नव्याने कळत आहेत. एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे मी तुझ्याजवळ मान्य करते आहे की हे सगळं खूप विलक्षण आहे. हे असं एक जग आहे ज्याबद्दल सामान्य माणसाला काहीच माहित नाही. पण जर एकदा त्याला त्या गोष्टी कळल्या तर त्याचा त्याला फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होतो हे नक्की. ", आता तिच्या स्वरात आत्मविश्वास डोकावत होता.
" तोटा? तो कसा काय? ", त्याने कुतूहलाने विचारलं.
" सिम्पल आहे ... तूच बघ ना.... माझ्या आजूबाजूला आत्ता ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याशी माझं आधीच्या जन्मात काय नातं होतं? मी त्यांच्याशी कशी वागत होते? ते माझ्याशी कसं वागत होते? हे समजल्यानंतर याचा सहाजिकच माझ्या त्यांच्या सोबत असणाऱ्या सध्याच्या वागण्यावर परिणाम होणार. त्यामुळे मला जर ते किंवा मी कोणीही चुकीचं वागला असू तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होणार बरोबर की नाही?" तिने तिची बाजू मांडली.
" बरोबर... मी एवढा विचार केला नव्हता. पण तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी कदाचित लोक जास्त स्पष्टीकरण देत नव्हते. हे असं आहे आणि हे असंच असणार आहे असं म्हणून मोकळं व्हायचे. पण तुला एक सांगू का आता जसं जसं आपण गोष्टी एक्सप्लोर करत आहोत तसं तसं मला सुद्धा जाणवू लागला आहे ही कधी कधी अज्ञानात सुख असतं.", तो म्हणाला.
" अर्थातच असतं रे... माणूस जितका अज्ञानी असतो तेवढा तो खोलवर जाऊन विचार करत नाही. आणि त्यामुळे तो गोष्टींचे वेगवेगळे अर्थही लावत बसत नाही. समोर आलेला आयुष्य आपल्या ठराविक चष्म्यातून बघतो आणि ते जगत राहतो. त्या उलट त्याच्या जाणिवा समृद्ध होऊ लागल्या की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि मग तिथून एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात होते... " , आता ती काही शी हरवल्यासारखी बोलत होती.
" परफेक्ट तुला बरोबर शब्दात मांडता आलं बघ. शेवटी तू शब्दांशी खेळ करणारी... त्यामुळे तुला नीट सांगता आलं. जसं जसं आपल्याला प्रत्येक गोष्टीमागचं कारण कळू लागतं तसं तसं आपल्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आकार घेऊ लागतं, असं मला वाटतं. आणि हळूहळू आपण प्रत्येक गोष्टीकडे अलिप्तपणे बघायला शिकतो. पण हा अलिप्तपणा आयुष्य सोपं करण्यापेक्षा जास्त त्रासदायक का करतो माहित आहे? कारण आपण विचारांपासून अलिप्त होण्याऐवजी माणसांपासून अलिप्त होत जातो. कसंही असलं तरी आत्ताच्या आयुष्यात जे आपल्या वाट्याला आलं आहे ते पूर्ण करणे... खरंतर योग्य पद्धतीने पूर्ण करणं हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. पण आपल्या जाणीव समृद्ध झाल्या की नकळतच आपण स्वतःला कुणीतरी वेगळी व्यक्ती समजू लागतो आणि आयुष्य जगण्याऐवजी त्यामध्ये दडलेल्या प्रत्येक रहस्याची उकल करणे हेच आपले आयुष्याचे ध्येय आहे, असं आपल्याला वाटू लागतं... तुला काय वाटतं?" आता त्याने तिला कोड्यात पाडेल असा प्रश्न विचारला.
पण ती सुद्धा त्याचीच मैत्रीण होती. जसं त्याचं वाचन, व्यासंग उत्तम होता तसाच तिचाही होता आणि हाच त्यांच्या मैत्रीतला महत्त्वाचा धागा होता. ते अशा विषयांवरती तासंतास चर्चा करू शकत असत.
त्याने प्रश्न विचारूनही बराच वेळ समोरून उत्तर आलं नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो बोलत असतानाच तिचा डोळा लागला आहे. तो गालातच हसला. त्यालाही अपेक्षितही होतं. सेशन झाल्यानंतर ती मानसिक रित्या जास्त थकत होती. त्यामुळे तिला अतिशय गाढ झोपेची गरज असतानाच तो तिला बोलण्यात गुंतवत असे. त्याच्याशी बोलताना तिच्या मनावरच ओझं अलगद उतरून जात असे. आणि त्यानंतर तिला झोपही छान लागत असे.
" सो गुड नाईट चिनू... तू पुन्हा एकदा बोलता बोलता झोपलीस. ठीक आहे हा विषय आपण पुन्हा कंटिन्यू करू. तू रेकॉर्डिंग ऐकशीलच याची मला खात्री आहे. " असं म्हणून सुमेधने फोन कट केला. आणि तो त्याच्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये जाण्यासाठी निघाला.
क्रमशः
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
टिप्पण्या