चिताभस्म भाग 7
#चिताभस्म भाग 7
पूर्वार्ध
चिनू आणि सुमेध तिच्या सेशन बद्दल बोलत असतानाच चीनूला झोप लागते. अन् त्यांचं बोलणं अर्धवट राहून जातं. पण बोलताना चीनने मांडलेले मुद्दे सुमेधला पटलेले असतात. तरीही चिनूला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे याची त्याला आणि तिला सुद्धा कल्पना असतेच.
आता पुढे...
चिन्मयीच्या बाबतीत ह्या गोष्टी सुरू झाल्या ते ती पंधरा वर्षांची असताना... तोपर्यंत तिचं आयुष्य सुरळीत चालू होतं. इतर मुलांप्रमाणे ती आनंदाने आपल आयुष्य एन्जॉय करत होती.
एके दिवशी चिन्मयी तिच्या घरच्यांसोबत प्रवासाला गेली होती.
ते जिथे गेले होते ते जरा बऱ्यापैकी अवघड ठिकाणी वसलेलं गाव होतं. तिथल्या एका वास्तू कलेबद्दल नुकतंच सोशल मीडिया वरती खूप काही दिसत असल्याने चिन्मयी आणि तिच्या भावाने तिथे जाण्याचा हट्ट धरला होता. मग हो , नाही करता करता घरातले सगळेच तयार झाले आणि ते त्या गावी राहण्याची सोय बघून सुट्ट्या घालवण्यासाठी गेले.
तिथे गेल्यानंतर त्यांना ते गावाकडचं वातावरण खूपच आवडलं. त्यांची सोय सुद्धा एका अतिशय छान वाड्यात झाली होती. तो वाडा ज्यांचा होता त्यांनीच सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेत लोकांसाठी होम स्टे सुरू केलेला होता. मुळातच तिथलं आदरातिथ्य बघून देसाई कुटुंब हरखून गेलं होतं. कारण शहरात इतक्या प्रेमाने जवळचे नातेवाईक सुद्धा वागत नाहीत याचा त्यांना अनुभव होताच.
चिन्मयीची मात्र त्या घरातील समवयस्क मुलींशी लगेच गट्टी जमली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांचा जवळच एका ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन सुद्धा बनला होता. कारण त्या मुली चिन्मयीला ते सगळं दाखवणार होत्या, जे शक्यतो येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला दाखवलं जात नसे.
सगळ्यात आधी तर गावात असणाऱ्या टेकडीवर पहाटे चढून जाऊन सूर्योदय पाहण्याची त्यांची तयारी झाली होती.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून पाचही मुलांनी सगळं आवरलं. चिन्मयी,तिचा भाऊ आणि ते ज्या घरात थांबले होते तिथल्या दोन मुली आणि त्यांचा भाऊ असे सर्वजण टेकडीवर जाण्यासाठी निघाले.
टेकडीवर चढून जाण्यासाठी त्यांना अर्धा तास तरी लागणार होता. त्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर तिथेच नाष्टा करायचं त्यांचं प्लॅनिंग होतं. तसं सगळं सामान घेऊन सगळी मुलं निघाली.
" स्निग्धा , तुम्ही तर बऱ्यापैकी वेळा जात असाल ना टेकडीवर?", चिन्मयीने विचारले.
" नाही गं आता मागच्या वर्षी जेव्हापासून तो व्लाॅग आला. तेव्हापासून बऱ्यापैकी गोष्टी बदलल्या. नाहीतर आधी आम्हाला कोणालाही गावात मोकळं फिरण्याची सुद्धा मुभा नव्हती. " स्निग्धा म्हणाली.
" असं का? म्हणजे तसं बघायला गेलं तर तुमचं गाव काही जंगलाजवळ सुद्धा नाहीये. त्यामुळे जंगलातले प्राणी वगैरे गावात येत असतील अशी ही परिस्थिती नाही. मग असं काय कारण होतं की मोकळेपणाने फिरण्याची सूट नव्हती?", चिन्मयीने कुतूहलापोटी विचारले.
"मी सांगतो.", स्निग्धाचा मोठा भाऊ अर्जुन मध्येच त्या दोघींना थांबवत म्हणाला. तसं सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं. कारण तो फारसा कोणाशी बोलत नव्हता.
सगळ्यांची नजर आपल्यावर येऊन स्थिरावली आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने घसा खाकरत बोलायला सुरुवात केली.
" मीच सांगू शकतो कारण जेव्हा गोष्टी घडत होत्या, तेव्हा स्निग्धा आणि मुग्धा दोघी खूप लहान होत्या. त्यामुळे त्यांना फारसं काही आठवणार नाही. आधी गावामध्ये अशी आख्यायिका होती की फार पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळात ... इथे बऱ्यापैकी सधन कुटुंब राहत होती. त्या काळातल्या लोकांचं राहणीमान आणि त्यांची विचारसरणी सुद्धा फार वेगळी होती. त्यातली काही कुटुंब स्वभावाने चांगली होती तर काही स्वतःकडे सगळं असून सुद्धा अतिशय विचित्र विचार करणारी होती. त्यातलाच एक कुटुंब इनामदारांचं होतं. म्हणजे ते इनामदार होते. त्यांचं खरं नाव काय होतं ते मला नाही आठवत. त्यामुळे आपण सध्या तरी त्यांना इनामदारच म्हणू. " , असं म्हणून तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याला अडवत मुग्धा म्हणाली, " आम्ही लहान आहोत म्हणून आम्हाला वेड्यात काढतो आहेस का तू दादा? मी ही असली गोष्ट कोणाकडूनच ऐकली नाही. तुलाच कशी काय माहित?"
" कारण मला ही गोष्ट आपल्या आजोबांनी सांगितलेली होती. आणि काही गोष्टी मी त्यांच्याबरोबर गावातून फिरायचो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून मला समजल्या. तसंही आपल्या गावाचा इतिहास सांगून तुम्हाला वेड्यात काढून मला काय मिळणार आहे? प्रत्येक गोष्टीत तुझं डोकं एवढं कळवायची गरज नाही कळलं का मुग्धे?", अर्जुन तिला टपली मारत म्हणाला.
" असं होय.. मग ठीक आहे. नाहीतर मला वाटलं त्या आमच्या वर्गातल्या स्वातीच्या भावासारखं.... तू पण आता गावात शंभर एक भूतं आहेत आणि ती नाचत फिरतात, अशी काही गोष्ट तयार केली आहेस. ", हसत हसत मुग्धा म्हणाली. तसे सगळे जण मोठमोठ्याने हसू लागले.
" अरे म्हणजे काय!!! त्याने तसं सांगितलं, तेव्हापासून स्वाती वर्गात सगळ्यांसमोर तेच सारखं सांगत असते. आणि सगळेजण त्यावर विश्वास ठेवून तेच खरं मानत आहेत. आम्ही मात्र हसून हसून बेजार होतो. कारण रोज नवीन विद्यार्थ्याला पकडून तिचं ते स्टोरी सांगणं सुरू असतं. अर्थात यामुळे तिचा फायदा झाला आहे. इतके दिवस ज्या मुलीकडे कोणी ढुंकून बघत नव्हतं. आता तिला शाळेत सगळेजण भाव देत आहेत. ", पुढचं स्पष्टीकरण स्निग्धाने दिल.
" पण मग खरंच इथं भूत आहेत का?", चिनूच्या भावाने विचारले. तो त्या सगळ्यांमध्ये वयाने लहान होता. त्यामुळे सहाजिकच त्याला भीती वाटली.
" अरे नाही रे, हे असलं इथं काहीही नाहीये. लोकांच्या मनात भीती होती आणि काही चुकीची लोक इथे राहत होती. त्या सगळ्याचे परिणाम म्हणून अशा भाकडकथा तयार झाल्या आहेत. ", त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावून सांगत अर्जुन म्हणाला.
" तू म्हणतो आहेस ना दादा म्हणून मी विश्वास ठेवतो नाहीतर तसंही आपण आत्ता भूतांसोबतच फिरतो आहोत.", असं म्हणून तो त्या तिघींकडे बघू लागला.
त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आल्यावर तिघीही त्याच्या मागे धावल्या. अर्जुनने सुरू केलेली गोष्ट अर्ध्यातच राहिली आणि ते सगळे मस्ती करत टेकडीवर येऊन पोहोचले.
आता कुठे तांबडं फुटायला सुरुवात झाली होती. हळूहळू सूर्यदेव त्यांच्या किरणांचा पसारा सावरत अंधाराला दूर करत होते.
हातातल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चिन्मयीने भराभर ते सगळं टिपायला सुरुवात केली. पण त्या नादात तिला आपण पुढे पुढे जात आहोत याचं भान उरलं नाही. एका क्षणी तिचा पाय घसरला. कोणाला काही कळण्याच्या आत चिन्मयी टेकडीच्या दुसऱ्या बाजूने खाली घसरली.
ती घसरल्याचं लक्षात येताच अर्जुन पुढे धावला. त्याने एका हाताने बाकी तिघांना मागे सरकण्याचा इशारा केला. पण तिला हात देण्याच्या नादात त्याचा सुद्धा पाय घसरला. आणि तो सुद्धा वेगाने खाली जाऊ लागला.
खाली पडत असताना मात्र तो घरी निरोप द्या असं जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकताच स्निग्धाने घरी फोन लावला. आणि पुढच्या वीस मिनिटात सर्वजण तिथे येऊन हजर झाले. गावातले चार-पाच तरुण दोरी बांधून खाली उतरू लागले. ती टेकडी तशी फारशी उंच नव्हती. पण पलीकडच्या बाजूला जाण्याची वेळ कधी कोणावर आली नव्हती.
दुपारच्या बारा पर्यंत सुद्धा चिन्मयी आणि अर्जुन सापडले नाहीत, तेव्हा मात्र सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली.
इतकच काय ते दोघेही घसरत गेल्याच्या खुणा सुद्धा पुढे जाऊन सापडल्या नाहीत. नाही म्हणायला चिन्मयीचा कॅमेरा एका झाडाच्या फांदीला लटकलेला सापडला.
वर आल्यानंतर त्या मुलांनी तो तिच्या बाबांच्या हातात दिला. दुपारनंतर जवळच्या तालुक्याच्या गावातील पोलीस अजून मदत घेऊन तिथे येऊन हजर झाले. खरंतर जवळपास 60 वर्षानंतर त्या गावात अशी घटना घडली होती.
गावातल्या जुन्या जाणत्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार टेकडीच्या दुसऱ्या बाजूला काहीतरी विचित्र होतं. त्यामुळे तिकडे गेलेली लोकं सहजा सहजी परत येत नसत.
चिन्मयीचे आई-बाबा डोक्याला हात लावून बसले होते. तीच गत अर्जुनच्या वडिलांची सुद्धा होती.
पण एकमेकांना दोष द्यावा असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. कारण जे काही घडलं होतं, ते खूपच विचित्र होतं. शेवटी संध्याकाळी उशिरा शोध थांबवून पोलिसांनी त्यांना घरी जायला सांगितलं.
घरी आल्यावर त्यांच्या फोनला बऱ्यापैकी रेंज आली होती. टेकडीवर सलग फोन लागत नव्हते त्यामुळे आजी आजोबांचा फोन कनेक्ट होत नव्हता.
घरी आल्या आल्या आजोबांचा फोन आला. फोनवर पणजी आजी बोलत होती. तिने सगळ्यात आधी चिनू कुठे आहे हाच प्रश्न विचारला.
पणजी आजीला वयानुसार सगळं आठवत नव्हतं. चिन्मयीच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट तिला नीट लक्षात राहत असे.
आता सुद्धा बोलता बोलता ती चिनूच्या बाबांना म्हणाली, " काही होणार नाही तिला. तू अजिबात काळजी करू नकोस. जे काही घडलं आहे ते भल्यासाठीच घडलं आहे. ती आणि तो पोरगा दोघेही उद्या सकाळी दारात उभे असतील बघ. ते सुद्धा धडधाकट."
हे ऐकल्यावर अर्जुनच्या वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटले. कारण पणजी आजीला अर्जुन सुद्धा चिनू सोबत आहे हे सांगितलं नव्हतं.
आजूबाजूच्या बायकांनी पुढाकार घेत रात्री या सर्वांच्या जेवणाची सोय केली. जबरदस्तीने का होईना त्यांना जेवायला लावलं. रात्रभर तर तसंही कोणाला झोप लागणारच नव्हती. पण पहाटे पहाटे सगळ्यांचाच डोळा लागला. आणि पाच वाजता वाड्याच्या मोठ्या दरवाजावर थाप पडली.
अर्जुन चे वडील गडबडून उठले आणि दरवाज्याच्या दिशेने धावले. त्यांच्या पाठीमागे चिनूचे बाबा सुद्धा जागे झाले होते.
अर्जुनच्या वडिलांनी थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला.
समोर एक 45 - 50 वर्षाचा व्यक्ती उभा होता. त्याच्या कपाळावर टिळा होता आणि गळ्यात माळ होती. वारकरी वाटत होता.
दार उघडलेलं बघताच तो व्यक्ती हसऱ्या चेहऱ्याने हात जोडत म्हणाला, " नमस्कार माऊली, मी या पोरांना इथे घेऊन आलो होतो. ही तुमचीच पोर आहेत का? त्यांना गावाचा रस्ता सापडत नव्हता. मला काल रात्री ही दोघं टेकडीच्या पायथ्याशी भेटली. पण खूप उशीर झाला होता म्हणूनशान मी ह्यांना माझ्या घरी घेऊन गेलो. पहाटं लवकर निघालो व्हतो. ह्या गावाच्या जवळ आल्यावर या पोराला थोडीफार जागेची ओळख पटली. मग तुमचं घर शोधलं. "
अर्जुनच्या वडिलांनी त्यांच्या खांद्यावरून मागे बघितलं. अर्जुन आणि चिनू रडवेल्या चेहऱ्याने उभे होते.
दोघांच्याही बाबांचा त्यांच्याकडे लक्ष जाताच ते दोघेही त्यांच्या गळ्यात जाऊन पडले. कालचा अनुभव त्या दोघांसाठी हादरवून टाकणारा होता.
त्या व्यक्तीला नमस्कार करून अर्जुनच्या वडिलांनी सगळ्यांना वाड्याच्या आत मध्ये घेतलं. एव्हाना बाकी सगळ्यांना जाग आली होती.
मुलं आता काहीशी सावरली होती.
पण सगळ्या मोठ्यांच्या मनात एकच प्रश्न होता....हे नेमके हरवले कोठे होते? कारण टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ओसाड माळरान होतं. एकही गाव नव्हतं.....
मग हा माणूस नेमका होता तरी कोण?
क्रमशः
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
टिप्पण्या