चिताभस्म भाग 1

#चिताभस्म
विनाशातून निर्माण होणाऱ्या नव्या अस्तित्वाची कथा

वर्ष 1960 ते 65 च्या दरम्यान , रात्री 1.52 मिनिटे 
महाराष्ट्रातील एक छोटेसे गाव, 
त्या गावातील बऱ्यापैकी श्रीमंत घरात आत्ता मध्यरात्री मात्र चांगलीच खळबळ उडाली होती. 

घराच्या दिवाणखान्यात एक तरुण पुरुष दोन्ही हातानी आपले डोके गच्च धरून बसला होता. 
अधून मधून त्याची नजर आतल्या खोलीच्या दिशेकडे वळत होती. पण उठून त्या खोलीमध्ये जायची त्याची हिंमत होत नव्हती. 
काही क्षणातच त्या खोलीतून एक वयस्कर स्त्री आणि तिच्या पाठोपाठ एक पुरुष बाहेर पडले. 
 त्या पुरुषाने बाहेर पडताच खोलीला बाहेरून कडी लावली आणि तो त्या स्त्रीला एका हाताने बाजूला करत दणादण पावले आपटत दिवाणखान्यात आला. 
त्याच्या चेहऱ्यावरूनच तो प्रचंड रागावलेला आहे हे दिसत होतं. 
"अहो माझं ऐका तरी ..." , त्या स्त्रीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिचा आवाज जणू कानावरच पडला नाही अशा पद्धतीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. 
तो आता त्या तरुण पुरुषाच्या समोर येऊन उभा होता. आणि जळजळीत नजरेने त्याच्याकडे बघत होता. 
त्या तरुण पुरुषांमध्ये त्याच्या नजरेत नजर घालून बघायची हिंमत नव्हती. 
शेवटी त्या वयस्कर पुरुषाने त्या तरुणाच्या कॉलरला धरून त्याला उभे केले आणि अंगात होती नव्हती तेवढी ताकद वापरून त्याच्या श्रीमुखात भडकावली. 
अचानक झालेल्या या गोष्टीमुळे तो तरुण भेलकांडात जमिनीवर पडला. 
ती स्त्री धावतच पुढे आली आणि तिने जमिनीवर पडलेल्या त्या मुलाला उभा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्याही परिस्थितीत तिचा हात झिडकारत तिला लांब ढकलले. 

" फक्त आणि फक्त तुझ्या हट्ट खातर आम्ही तुझं लग्न तिच्याशी लावून दिलं होतं. ते लावून देताना आम्ही तुला आधीच सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती. पण तरीही तू करायचं तेच केलं. तुला जरा सुद्धा धीर धरवला जात नव्हता का?" आता तो वयस्कर पुरुष चिडून विचारत होता. 

" माझं काय चुकलं आप्पा? लग्न केलं आहे मी तिच्याशी.... नवरा आहे मी तिचा... माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणं तिचं कर्तव्य आहे ना? फार काही अपेक्षा नव्हतीच माझी तसही आज न उद्या तिला गोष्टी मिळणार आहेतच ना?" तो तरुण म्हणाला. 

" अरे पण लग्नात तिच्या आई बापाने काय कमी केलं का तुला? आणि आताही गेले वर्षभर प्रत्येक सणाच्या निमित्ताने ते काही ना काही देत आहेत. मग असं असताना तुझी हाव कशी संपत नाही?" इतका वेळ गप्प असलेली त्याची आई मध्येच बोलली. 

" आई तू मध्ये बोलू नकोस. मी आप्पांशी बोलतो आहे ना? पुरुषांनी बोलत असताना स्त्रियांनी मध्ये बोलायचं नाही असा आपल्या घराचा नियम आहे हे विसरलीस का तू?", तो त्याच्या आईला म्हणाला. पण हे बोलत असताना त्याच्या आवाजात आपण आपल्या आईशी बोलत आहोत याचे भान अर्थातच जाणवत नव्हते. 
त्याचं वाक्य पूर्ण होताच पुन्हा एकदा त्याच्या वडिलांनी त्याच्या श्रीमुखात भडकवली. 
" आप्पा विसरू नका मी कोण आहे ते?", तो धरून जळजळीत नजरेने स्वतःच्या वडिलांकडे पाहत त्यांना उद्देशून म्हणाला. 
" मी विसरलो नाहीच पण तुला मात्र सध्या विसर पडला आहे की मी तुझा बाप आहे आणि ही तुझी आई... माझ्या वडिलांनी केलेल्या चुकांची फळ आम्ही भोगत आहोत आणि कदाचित ती आम्हाला पुढेही भोगावे लागतील. पण आज मी तुला एक गोष्ट सांगतो तू काहीही कर आज ना उद्या तुला तिच्यासोबत केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब द्यावा लागेल. आणि तेव्हा तुला कुठलीही माफी मिळणार नाही." आता त्याच्या वडिलांच्या आवाजात हतबलता जाणवत होती. 

थकलेल्या पावलांनी ते स्वतःच्या खोलीकडे निघाले. एवढ्यात पाठीमागून त्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. 

" जिथे आहात तिथेच थांबा दोघेही... अजून माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. तिच्याबरोबर मी काय केलं आणि माझ्याबरोबर काय होणार हे बघायला मी समर्थ आहे त्याची काळजी तुम्ही दोघेही करू नका. पण आता इथून पुढे तिच्याबरोबर जे काही होईल ते मात्र तुम्हाला इथे याच घरात राहून बघायचं ही आहे आणि पचवायचंही आहे हे लक्षात ठेवा. " असे म्हणत तो अतिशय कुत्सितपणे हसला. 
आणि हसताना नकळतच त्याच्या डाव्या डोळ्याची एक भुवई वरती गेली. 
हे बघितल्यावर त्याच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला. 
कारण ही कृती म्हणजे कोण होती त्यांच्या घराण्याला असलेला शाप पुन्हा जिवंत झाल्याची....

या शापातून आजतागायत कोणीही वाचलं नव्हतं...
कारण त्याचा उपाय सुद्धा तेवढाच भयंकर होता...

त्याचवेळी बंद असलेल्या त्या खोलीत ती मात्र आपले हुंदके आतल्या आत जिरवण्याचा प्रयत्न करत होती. 
मनातल्या मनात मात्र त्या क्षणी तिला फक्त तिची आई आठवत होती... आपली आपल्या आईसोबत शेवटची भेट तरी व्हावी एवढी एकच इच्छा ती देवा जवळ व्यक्त करत होती. 

त्या क्षणी तिला दरवाज्याची कडी काढल्याचा भास झाला...
तिने नजर उचलून समोर बघितलं...
तिला अपेक्षित नसलेली दोन पावलं तिला दरवाज्याच्या उंबऱ्याजवळ दिसली...
आणि त्यानंतर फक्त आणि फक्त अग्नीच्या ज्वाला तिच्या डोळ्यासमोर तांडव करत होत्या...
हीच तिच्या आत्म्याकडे असलेली शेवटची स्मृती होती.

आठवणी ... जेवढ्या हव्याहव्याशा असतात तितक्याच नकोशाही असतात. 
पण जर आपल्याला आठवत असणाऱ्या त्या आठवणी आपल्या ह्या जन्मातल्या नसून आधीच्या जन्मातल्या आहेत हे समजलं तर???
माणूस चुका करणे टाळेल की अजून चुका करत सुटेल? 

क्रमशः 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिताभस्म भाग 6

चक्रव्यूह भाग 5

चक्रव्यूह भाग 11