चिताभस्म भाग 5

चिताभस्म भाग 5
पूर्वार्ध 
 आपल्या कथेतली दोन मुख्य पात्र मात्र त्यांच्या गतजन्मांच्या आठवणींचे गाठोड सोबत घेऊन आलेली आहेत. 
मग विचार करा त्या दोघांच्याही पाप आणि पुण्याची गाठोडी किती मोठी असतील? 

आता पुढे, 

एकीकडे आता सदानंद आणि केशव या दोघांच्या देखरेखी खाली अमरचं ट्रेनिंग सुरू झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. हळूहळू त्यांना अमरच्या वागण्यात अपेक्षित असलेले बदल दिसू लागले होते. जे भाकीत अमर बद्दल सदानंद यांना समजलं होतं ते खरं ठरेल ही भीती आता कमी होऊ लागली होती. 
अमरचा प्रवास आता त्याच्या ध्येयाच्या दिशेने सुरू झाला होता. 

तर दुसरीकडे, 
" आता डोळे मिटून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. हळूहळू जे स्वप्न तुम्हाला सातत्याने त्रास देत त्याचा विचार करायला सुरुवात करा. मी तीन पर्यंत आकडे मोजेन आणि त्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागेल. एक, दोन, तीन ...", असं म्हणून त्या व्यक्तीने चुटकी वाजवली. आणि ज्या व्यक्तीसाठी या सूचना होत्या तिला क्षणार्धात गाढ झोप लागली. 
तिचा श्वास एका संथ लयीत सुरू झाला. चुटकी वाजवणारी व्यक्ती अर्थातच डॉक्टर होती. त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. 
" आता तुम्हाला समोर काय दिसत आहे?", डॉ.

" एक टुमदार घर, बाहेरून दिसायला तरी बऱ्यापैकी सुंदर आहे.", तिने सांगितलं. 

" ओके मग आता आपण घराच्या आत मध्ये जायचं का? की तुम्हाला त्या घराबद्दल अजून काही विशेष सांगायचं आहे?", डॉ.

"नाही,आपण आत मध्ये जात आहोत. पण मला हे घर बघून फार चांगल्या भावना मनात येत नाहीत." ती व्यक्ती 

"असं का होत आहे? ," डॉ. 

" माहित नाही, पण हे घर मला नेहमी स्वप्नात दिसतं आणि त्यानंतर अचानक कोणाचे तरी पाय, आणि मग आगीच्या ज्वाळा बास... मला हे सगळं सहन होत नाही. " असं म्हणत ती व्यक्ती जोरजोरात श्वास घेऊ लागली आणि त्यानंतर अचानक शांत झाली. 

डॉ. नी पुढच्या सूचना देत तिला जागे केले. आणि त्या दिवशीचा शोध तिथेच थांबला. 

डॉक्टरांकडून खंडीभर सूचना ऐकून ती घरी परत आली. डॉक्टर तिच्या वडिलांचे मित्रच असल्याने त्यातल्या त्यात तिला हे सगळं बऱ्यापैकी सुसह्य होत होतं. पण घरी परतण्याच्या वाटेवर तिला कल्पना होती की घरी असलेले चार डोळे तिची आतुरतेने वाट पाहत असतील. 

ज्या व्यक्तीला डॉक्टरांनी संमोहित केलं होतं, ती व्यक्ती एक मुलगी होती. आणि आता ती तिच्या घरी परत येत होती. जिथे तिचे आजी-आजोबा तिची वाट बघत होते. 

ती घरी परत आली तसं त्या दोघांचे चेहरे बघून तिला खूप वाईट वाटलं. इच्छा असूनही ती त्यांना जास्तीच्या अपेक्षा वाटतील असं काही सांगू शकत नव्हती. मुळात अजूनही तिच्याकडे त्यांना सांगण्यासारखं काहीच नव्हतं. 

त्याचवेळी तिच्यासोबत गेलेला तिचा भाऊ पाठीमागून आला आणि त्या तिघांचे एकमेकांकडे बघणारे चेहरे बघून त्याला वातावरणाचा अंदाज आला. तो तिला हलकीशी टपली मारत आजी जवळ जाऊन बसला. आणि म्हणाला, " आजी तुला माहितीये का आज काय झालं?" 
आजीने उत्सुकतेने विचारले, " काय झालं?"
" अगं आज हिला सूचना देता देता डॉक्टर काकाच झोपून गेले. आणि मग काकूने कशी काल रात्री त्यांना बळजबरीने भोपळ्याची भाजी खाऊ घातली त्याबद्दल सांगू लागले.", तो अगदी सिरीयस चेहरा करून आजीला सांगू लागला होता. 

पण तो काय बोलतोय हे लक्षात येताच आजीने त्याच्या पाठीत प्रेमाने धपाटा घातला. आणि म्हणाली, " माझ्या म्हातारीची चेष्टा करतोस होय?"

"नाही गं आजी,मी कशाला तुझी चेष्टा करेन ? मी खरं तेच सांगतोय. तुला हवं तर तू डॉक्टर काकाला फोन करून विचार. ही तुझी नात आहे ना ही डेंजरस आहे बर का?", तो हसत हसत म्हणाला. 

" ती डेंजरस आहे होय रे आणि तू डांबरट बरोबर ना?", तिथे आलेल्या आजोबांनी त्याचा कान धरला आणि ते म्हणू लागले. 

" काय आजोबा मी किती गरीब बिचारा आहे. तुम्हाला ना माझी कदरच नाही. मी तुम्हाला खरोखर जे झालं ते सांगितलं. जाऊदे बाबा मी जातोच इथून.", असं म्हणून जाता जाता आपल्या बहिणीची खोड काढून तो त्याच्या खोलीत पळाला. 
तो तिथून पळून गेला तस ती आजी-आजोबांच्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, " तुम्ही दोघे काहीही टेन्शन घेऊ नका आपण लवकरच या सगळ्या गोष्टी शोधून काढू. आणि त्यासाठी मला कोणाचीही मदत घ्यावी लागली तरी मी घेईन." 

" पण हे असं अजून किती वर्ष चालणार चिनू? कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यादिवशी काय घडलं होतं ते कधीच कळणार नाही का? इतकी वर्ष आम्ही वाट बघत आहोत पण अजूनही काहीच हाती लागलं नाही. देवाने आमचे डोळे मिटण्याआधी आम्हाला सत्य कळावे इतकीच आमची इच्छा आहे." तिचे आजोबा म्हणाले. 

" नक्कीच आजोबा, मी पणजी आजीला प्रॉमिस केलं होतं. आणि तुम्हाला माहित आहे ना तो लवकरच परत येतो आहे. तो परत आला की आपल्याला अजून काही गोष्टी स्पष्ट होतील. " ती म्हणजे चिनू म्हणाली. 

" बरोबर आहे तुझं, तो ह्या सगळ्या मध्ये आपली नक्की मदत करेल. बरं चल त्या गरीब बिचाऱ्या माणसाला बोलावून आण, मी तुमच्या दोघांसाठी काहीतरी खायला करते. ", हसत हसत आजी म्हणाली. 
" आलेच.", असं म्हणून चिनू तिच्या खोलीकडे पळाली. 
आत मध्ये जाणाऱ्या पाठमोऱ्या चीनूकडे बघून आजी आजोबांनी सुस्कारा सोडला. 
" काय लिहून ठेवलं आहे या पोरीच्या नशिबात काय माहित?", असं म्हणत आजी स्वयंपाक घराच्या दिशेने वळाल्या. 
" असं नको म्हणूस, तिचं नशीब आणि भविष्य दोन्ही खूप चांगलं असणार आहे. देव प्रत्येकालाच आपला हिशोब पूर्ण करायची संधी देत नाही हे लक्षात ठेव. पण तिला ती संधी मिळणार आहे. आणि जेव्हा ती संधी मिळेल तेव्हा ते बघण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं एवढीच प्रार्थना कर. " , आजोबा म्हणाले. 
" खरं आहे तुमचं, मी सुद्धा मनोमन त्याच दिवसाची वाट पाहत आहे.", आजी भिंतीवर असलेल्या त्या फोटोंकडे पाहत म्हणाल्या. 

चिनू, देसाई कुटुंबातली महत्त्वाची व्यक्ती... सगळं घर तिच्याभोवती फिरतं असं म्हटलं तरी चालेल. खरंतर तिचा स्वभावच असा होता की लोक आपसूक तिच्याकडे आकर्षित होत. 
तिच्या आई-वडिलांसाठी तर ती लकी चार्म होती. आणि आजी आजोबांसाठी खास करून तिच्या पणजी आजीसाठी ती त्यांचं आनंदाचा गाठोडे होती... होय काही वर्षांपूर्वी तिची पणजी आजी देवा घरी गेली होती. पण तोपर्यंत चिनू एक दिवस सुद्धा त्यांच्यापासून लांब राहिली नव्हती. 
त्या दोघींमध्ये बॉण्ड असा काही होता की बघणाऱ्याला आश्चर्य वाटायचं... आपणही ते सगळं अनुभवणार आहोतच येणाऱ्या भागांमध्ये. ...
आता तुमची उत्सुकता न ताणता सांगून टाकते चिनू ही आपल्या कथेतील दुसरं महत्त्वाचं पात्र आहे.
 पहिलं पात्र अर्थातच आपण त्याला भेटलो तो म्हणजे अमर... 
पण हा आत्ताच बाकी काही अंदाज लावू नका बर का... गोष्ट हळूहळू उलगडण्यात जी मज्जा आहे ती एकदम समोर येण्यात नक्कीच नाही... त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे हे तुमच्या लक्षात येईलच... 
तोपर्यंत... गेस करा...
क्रमशः 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
(9730961014) 
चिताभस्म 
भाग 1
https://www.facebook.com/share/p/1ExKNQ1mwH/
भाग 2
https://www.facebook.com/share/p/1DCHa3eR6o/
भाग 3
https://www.facebook.com/share/p/1EWxLReArH/
भाग 4 
https://www.facebook.com/share/p/1GNgUFRxhV/



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिताभस्म भाग 6

चक्रव्यूह भाग 5

चक्रव्यूह भाग 11