चिताभस्म भाग 4
#चिताभस्म भाग 4
पूर्वार्ध
जेव्हा जेव्हा सदानंद केशव यांना काही शिकवत असत, समजावून सांगत असत.... तेव्हा लहानगा अमर त्या दोघांच्या आसपासच खेळत असायचा. किंवा खेळत असल्यासारखे भासवायचा. त्याचे कान मात्र त्या दोघांची काय चर्चा सुरू आहे याकडे लागलेले असायचे.
त्याला फारसं स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे तो काय बडबड करतो आहे हे अजून घरात कोणाला लक्षात येत नव्हतं. पण जर त्यांनी लक्षपूर्वक त्याचा बोलणं ऐकलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की त्याचं नेमकं काय चाललं आहे.
आता पुढे,
पण एके दिवशी मात्र एक अतिशय वेगळी गोष्ट घडली आणि अमरच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला.
सदानंद केशवला सांगत होते.
" केशव तुला महाभारताची कथा तर माहित आहेच. धृतराष्ट्राला शंभर पुत्र झाले आणि ते सर्वच्या सर्व युद्धात मारले गेले. पण त्या कथे मागचे एक महत्त्वाचे कारण मात्र मी तुला सांगतो. जे आपल्याला विशेषतः अमरच्या बाबतीत उपयोगी पडणार आहे."
"कोणतं कारण?", केशव ह्यांनी उत्सुकतेने विचारले.
" आतापर्यंत माझी शिकवलं त्यावरून तुला हे लक्षात आलं आहेच की ह्या जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे त्या जगतनियंत्याची एक योजना असते. धृतराष्ट्राला हस्तिनापूरचं साम्राज्य मिळण्यामागे आणि शंभर पुत्र होण्यामागे सुद्धा अशीच एक योजना होती.
राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का झालं? माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणाम स्वरूप माझ्या सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू डोळ्यादेखत बघून ते दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे.
त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी राजाला आपला पूर्व जन्म पाहण्यासाठी दिव्यदृष्टी प्रदान केली. राजाने दिव्यदृष्टीने बघितले की साधारण पन्नास जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिल्ले उडून शकल्याने त्या आगीत होरपळली. आणि मृत्युमुखी पडली. आता राजाचे हे जे क्रियामाण कर्म होते ते संचितकर्माच्या रूपात पक्व होऊन राजाला फळ देण्यासाठी वाट पाहत होते.
पन्नास जन्मांपूर्वीच्या क्रियामाण कर्माने दीर्घकाळ लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नव्हता. राजाची एका जन्मात शंभर पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसले आणि संधी मिळाल्यानंतर त्याला फळ देऊनच शांत झाले.
ह्यामधून तू काय शिकलास केशव?", असं विचारताना हाताने मात्र केशवना गप्प राहण्याची खूण करत सदानंदांनी अमरकडे पाहण्यास सुचवले.
ते दोघेही एकटक अमरकडे पाहत होते. सदानंद ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर केशवऐवजी अमरने दिले.
" ह्याचा साधा सरळ अर्थ हाच होतो की मला माझ्या पापांची शिक्षा भोगण्याआधी भरपूर पुण्य कमवावे लागेल. आणि ते पुण्य कमावण्यासाठी मी चांगलं वागणं गरजेचं आहे. " अमरला अचानक मोठ्या माणसाच्या आवाजात बोलताना बघून केशवना आश्चर्य वाटले.
पण सदानंदांना मात्र या गोष्टीची कल्पना होती. त्यांनी अतिशय शांतपणे अमरला हाक मारली.
"अमु बाळा इकडे येतोस का?", सदानंद म्हणाले.
त्यांचा आवाज ऐकताच अमर जणू काही भानावर आला. आणि दुडूदुडू धावत त्यांच्याजवळ आला. बोबड्या भाषेत त्याने त्यांना विचारलं, " आजो तुम्हाला काही हवंय का? मी आनू?"
" हो तुझ्या मोठ्या आजीला सांग की आम्हाला दोघांना चहा करून दे.", सदानंदांनी अमरच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितलं.
त्यांच उत्तर ऐकताच अमर त्यांचा निरोप सांगण्यासाठी आजीकडे धावत गेला.
" केशव, मी आज अमरच्या समोर तुला ही गोष्ट सांगितली कारण हे सगळं त्याच्या कानावर पडावं असे मला संकेत मिळाले होते." सदानंद केशव कडे वळत म्हणाले.
" पण या संकेतांचा नेमका अर्थ काय बाबा? ", केशव ने विचारले.
" अर्थ साधा सरळ आहे, कर्माचा हिशोब कशा पद्धतीने चालतो, हे अमरच्या आत मध्ये दडलेल्या त्या गोष्टीपर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला करायचं होतं. त्याने ते ऐकलं, ह्याची प्रचिती तुला सुद्धा आली." , सदानंदांनी असं म्हणताच केशवनी होकारार्थी मान डोलावली.
" पण मग आता याचा परिणाम काय होणार?", केशवनी विचारले.
" ते आपल्याला कदाचित आज संध्याकाळपासूनच कळेल.", सदानंद म्हणाले.
काहीसं थांबून ते केशव कडे पाहत म्हणाले, " आज पासून मी जमेल तेवढ्या गोष्टी अमरला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता कदाचित पुढची काही वर्ष तरी तो विचित्र वागणार नाही याची मला खात्री आहे.",
" बरोबर आहे तुमचं, निदान स्वार्थी हेतूने का होईना तो चांगल्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करेल हे नक्की.", केशव म्हणाले.
त्यांना शिकवत असताना अमरला तिथेच रेंगाळू देण्यामागे सदानंद ह्यांचं काय कारण होतं हे आता केशव ह्यांच्या लक्षात येत होतं.
बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की लहान मुलं काही गोष्टी ऐकत नसतात. पण खेळत असताना सुद्धा त्यांचे कान मोठ्या माणसांच्या बोलण्याकडे असतात. आणि त्यांचा मेंदू नकळत बरीच माहिती स्वतःच्या आत मध्ये साठवून ठेवत असतो.
त्याच दिवशी संध्याकाळी,
संध्याकाळी दिवे लागणीनंतर सदानंद अमरला घेऊन देवघरात बसले. आणि त्यांनी शुभंकरोतीपासून त्याला शिकवायला सुरुवात केली.
आधी देवघरात पाऊल टाकण्यासाठी ठणाणा करणारा अमर आता मात्र अतिशय शांतपणे त्याच्या आजोंचं म्हणजे सदानंदाचे सगळं ऐकत होता.
घरात बाकी सगळ्यांना हे बघून आश्चर्य वाटत होतं.
पण अमरला त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टींकडे वळवण्याचा एवढा एकच मार्ग सध्या सदानंद यांना दिसत होता.
जबरदस्ती केली असती तर अमरने कदाचित सगळ्या गोष्टी करणं बंद करून टाकलं असतं.
निदान स्वतःचा फायदा होईल असं दिसल्याने अमर गुपचूप सगळ्या गोष्टी करायला तयार झाला होता.
धृतराष्ट्राच्या गोष्टीवरून एक गोष्ट केशव यांच्या लक्षात आली होती ती म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की वाईट वागणाऱ्या माणसांना देव लगेच शिक्षा का नाही करत? तेव्हा लक्षात घ्या, त्यांच्या क्रियामाण कर्माचा हिशोब देवाने आधीच करून ठेवलेला असतो. पण प्रत्येकाच्या पापाच्या दर्जा नुसार जर त्याला शिक्षा द्यायची म्हटली तर त्याला त्याच पद्धतीने पुण्य सुद्धा देव कमवायला लावतो. आणि तेवढे पुण्य कमावल्यानंतरच त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते.
इथे मी ह्या जन्मात चांगलं काम केलं म्हणून माझ्या आधीच्या पापांची शिक्षा कमी होत नाही. कारण मी आधीच्या जन्मात काय केलं आहे ते अर्थातच मला माहित नाही. आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू नये म्हणूनच देवाने अजून बऱ्याच गोष्टी करून ठेवलेल्या असतात.
त्यातलीच एक म्हणजे आपल्याला बऱ्याचदा गतजन्म आठवत नाहीत.
पण आपल्या कथेतली दोन मुख्य पात्र मात्र त्यांच्या गतजन्मांच्या आठवणींचे गाठोड सोबत घेऊन आलेली आहेत.
मग विचार करा त्या दोघांच्याही पाप आणि पुण्याची गाठोडी किती मोठी असतील?
भेटूया लवकरच पुढच्या भागात...
क्रमशः
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
(9730961014)
चिताभस्म
टिप्पण्या