चिताभस्म भाग 3

#चिताभस्म भाग 3
पूर्वार्ध 
आजोबा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि त्यांनी आत मधून दरवाजा लावून घेतला. हा पूर्ण वेळ अमर भोकाड पसरून रडत होता. 
पण काही क्षणातच त्याचा रडण्याचा आवाज बंद झाला. बाहेर उभे असलेल्या सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं. 
दरवाजाची कडी उघडली आणि समोरच दृश्य पाहून ते चौघेही आश्चर्यचकित झाले. 

आता पुढे 
दार उघडल्यानंतर त्या चौघांनीही बघितलं की अमर आजोबांच्या खांद्यावर मान टाकून शांत झोपून गेला होता. त्याला त्याच्या आजीच्या हातात देत त्यांनी झोळीत टाकण्यास सांगितलं. आणि त्यानंतर सर्वांना खोलीत आत मध्ये यायला खुणावलं. 
अमर आता कमीत कमी दोन तास तरी उठणार नव्हता. त्यामुळे त्यांना बोलण्यासाठी भरपूर वेळ मिळणार होता. 
दोन तासानंतर ते सर्वजण खोलीतून बाहेर पडले. खोलीत काय बोलणं झालं हे फक्त त्या चौघांना माहित होतं. 
त्या दिवसानंतर अमरच्या दिवसभराचं वेळापत्रक पूर्णपणे बदललं. आकाश आणि वर्षाने तर जणू काही त्याला आजोबांच्या ताब्यात देऊन टाकलं होतं. त्या कार्यक्रमानंतर प्रत्येक गोष्टीत चिडचिड करू लागलेला अमर काही दिवसातच पहिल्यासारखा शांत आणि हसून खेळून राहणारा झाला होता. पण त्याचं हे वागणं म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे हे फक्त आजोबांना माहीत होतं. 

काही महिन्यांनी अमरचे आजोबा म्हणजे आकाशचे वडील निवृत्तीनंतर कायमचे घरी परतले. ते सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची सातत्याने बदली होत असायची. एका वेळेनंतर मात्र त्यांनी आपले कुटुंब आपल्या गावी कायमसाठी शिफ्ट केले. कारण आकाशच्या आणि त्याच्या बहिणीच्या शिक्षणाची सातत्याने हेळसांड होऊ लागली होती. 

आकाशचे आजोबा म्हणजे सदानंद जोशी आणि त्यांची पत्नी सुलभा. त्यांना दोन मुलं मोठा मुलगा माधव आणि धाकटा केशव. 
माधव त्याच्या बायको आणि एका मुलासह परदेशी स्थायिक झाला होता. तर केशव मात्र त्याची पत्नी कल्याणी आणि आकाश, अंजली या दोन अपत्यांसह सदानंद जोशीं सोबतच राहत होता. म्हणजे तो फिरतीवर असायचा. पण त्याचं कुटुंब मात्र मुलं मोठी झाली तसं त्यांच्यासोबत राहत होतं. 
आकाश आणि वर्षा दोघेही एकाच गावात लहानाचे मोठे झाले होते. पहिल्यांदा मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
 सुरुवातीला सदानंद जोशी त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. पण नंतर त्यांनी त्या दोघांचं नातं मान्य करत लग्नाला परवानगी दिली. त्यामुळे आता आकाश आणि वर्षा त्यांचा मुलगा अमरसह सदानंद जोशींबरोबर रहात होते. लग्नाला केलेला विरोध सोडला तर आजोबांचा बाकी कुठल्याच गोष्टीत विरोध नव्हता. 

तसं बघायला गेलं तर आता हे कुटुंब आनंदाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहत होतं. पण या सुखी संसाराच्या चौकटीला लागलेल्या ग्रहणाबद्दल फक्त सदानंद जोशींनाच कल्पना होती. आणि आता लवकरच ते त्याबद्दल आपल्या मुलाला सांगणार होते. 

सदानंद जोशींनी ज्या गोष्टी आपली पत्नी, सून, नातू आणि नातसूनेला सांगितल्या नव्हत्या, त्या गोष्टी त्यांना स्वतःच्या मुलाच्या कानावर घालायच्या होत्या. 

केशव परत आल्यानंतर एके दिवशी सदानंद यांनी त्यांना आपल्या अभ्यासाच्या खोलीत बोलवून घेतले. 
" केशवा मी जे सांगतो आहे ते तुला कितीही अतर्क्य वाटलं तरी ते खरं आहे एवढं लक्षात ठेव. माझ्यानंतर तुला अमर वर वचक ठेवायचा आहे. " सदानंद म्हणाले तसं वचक या शब्दावर केशव यांच्या भुवया उंचावल्या. 

"हो तू बरोबर ऐकलंस. वचक ठेवायचा आहे. अमर कुणी साधासुधा आत्मा नाही. त्याने मागील जन्मात काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत. पण त्या गोष्टी करण्याआधी त्याने खूप भयंकर चुकाही केलेल्या आहेत. त्यामुळे वरवर पाहता आपल्याला असं वाटेल की अमरचं सगळं खूप छान चाललेलं आहे. पण हे सगळं छान त्याला एके दिवशी भयंकर विनाशाकडे नेणारं ठरणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून आता चुका होऊ नयेत म्हणून आपल्याला त्याला जपायचं आहे. अमरच्या आधीच्या जन्मातही तो कोणाचातरी पुनर्जन्म होता आणि आत्ताच्या जन्मातही तो असाच एका अतिशय हुशार व्यक्तीचा पुनर्जन्म आहे. " बोलून बोलून सदानंदांना दम लागलेला होता. 
हे सगळं ऐकल्यावर केशव काही क्षण स्तब्ध झाले होते. या सगळ्यांमध्ये आपण काय करणार आहोत हे त्यांना अजूनही लक्षात येत नव्हते. कारण त्यांचे वडील तरी पूर्वापार चालत आलेल्या काही अध्यात्मिक गोष्टींचे पालन करत होते. पण केशव आणि त्यांच्यानंतर आकाश मात्र नावापुरत्या गोष्टी करून मोकळे होत असत. 

"मला माहित आहे केशव तुला बरेच प्रश्न पडले आहेत. पण मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. काही उत्तर मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलेली आहेत. वेळ मिळाली की ती डायरी मी तुझ्या हातात सोपवेन. अमर सध्या तरी साध्या नॉर्मल लहान मुलांसारखा वागत आहे तोपर्यंत आपल्याला काही काळजी नाही. पण वेळेनुसार त्याच्या आवडीनिवडी आणि त्याच्या वागण्याच्या पद्धती बदलत जातील आणि ते इतक्या बदलतील की आत्ताचा अमर आणि नंतरचा अमर या मधला फरक तुम्हा सर्वांना सतत गोंधळात टाकेल. " 

" पण म्हणजे नेमकं काय होणार आहे बाबा?" , आता न राहवून केशव यांनी विचारले. 

" मी सगळं सांगायला योग्य व्यक्ती नाही केशव. आणि खरंतर मी सांगायलाच नको. पण नातवासाठी जीव तुटतो म्हणून काही गोष्टी सांगतो. अमरला त्याच्या पूर्व संचिताच्या जोरावर काही गोष्टी मिळतील. त्या गोष्टींचा त्याला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी उपयोग सुद्धा होईल. पण लक्ष्मी प्रमाणापेक्षा जास्त हातात आली की माणसाचं काय होतं हे मी तुला वेगळं सांगायला नको. ह्या सगळ्या पायऱ्या अमरने ओलांडू नये म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. पण जेवढं मला कळतं त्यावरून मी तुला इतकच सांगू शकतो की अमरला जप. " 

गोंधळलेल्या मनस्थितीतच केशवनी होकारार्थी मान हलवली. 

ह्या प्रसंगानंतर काही दिवसातच त्यांना आपल्या वडिलांच्या बोलण्याची प्रचिती आली. 

अमर आता तीन वर्षाचा होणार होता. घरात त्याला शाळेत घालण्याबद्दल सतत बोलणी सुरू असायची. पण गेल्या काही दिवसांपासून वर्षाच्या लक्षात आलं होतं की त्याचं खेळणं काहीसं विचित्रच आहे. तो त्याला न आवडणाऱ्या गोष्टी पूर्णपणे उध्वस्त करत असायचा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कोणी त्याला एखादं खेळणं गिफ्ट म्हणून आणलं आणि ते त्याला आवडलं नाही तर तो अक्षरशः त्या गोष्टीचे तुकडे करायचा. गिफ्ट आणणारी व्यक्ती घराबाहेर पडण्याआधीच ती वस्तू कचराकुंडीत गेलेली असायची. 

सुरुवातीला असे प्रसंग घडले तेव्हा वर्षाने कदाचित बाकी काहीतरी असेल म्हणून गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण आता मात्र हे सगळे प्रकार घडण्याचे प्रमाण वाढले होते. 
शेवटी तिने न राहवून सगळ्यांच्या समोर हा विषय काढला. अमर तिथेच बाजूला खेळत होता. आपली आई आणि घरातली बाकीचे लोक आपल्याबद्दल बोलत आहेत हे त्याच्या कानावर पडलं. आणि त्याचे कान टवकारले. आपले डोळे मोठे करून तो आईकडे बघू लागला. त्यानंतर काही क्षणातच हातात असलेली खेळण्यातली बॅट घेऊन तो आईजवळ गेला आणि त्याने ती बॅट जोर लावून तिच्या पाठीत मारली. 
शेजारी असलेल्या आकाशने लगेच त्याचा हात धरला. पण त्याचं हे वागणं सगळ्यांनाच कोड्यात टाकणार होतं. 
त्यानंतर दोनच दिवसात वर्षा तिच्या गाडीवरून येत असताना गेटच्या जवळ आल्यावर घसरून पडली. आणि तिला जबरदस्त मार लागला. अमर तिच्या समोरच उभा होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून वर्षाला खूप जास्त धक्का बसला. 

आपली आई गाडीवरून पडल्यानंतर एखादं मूल धाय मोकलून रडलं असतं. पण अमर मात्र समोरचं दृश्य पाहून खुश झालेला दिसत होता. त्याच्यामध्ये असणाऱ्या खुनशी प्रवृत्तीची ही पहिली झलक होती. 

हे घडल्यानंतर केशव यांना लक्षात आलं की आता आपण सूत्र हातात घेण्याची गरज आहे. मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी आपल्या वडिलांकडून त्यांना असलेले ज्ञान शिकण्याला सुरुवात केली होती. ही अतिशय चांगली गोष्ट होती. 
पण हे सगळं करत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती. ती म्हणजे जेव्हा जेव्हा सदानंद केशव यांना काही शिकवत असत, समजावून सांगत असत.... तेव्हा लहानगा अमर त्या दोघांच्या आसपासच खेळत असायचा. किंवा खेळत असल्यासारखे भासवायचा. त्याचे कान मात्र त्या दोघांची काय चर्चा सुरू आहे याकडे लागलेले असायचे. 
त्याला फारसं स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे तो काय बडबड करतो आहे हे अजून घरात कोणाला लक्षात येत नव्हतं. पण जर त्यांनी लक्षपूर्वक त्याचा बोलणं ऐकलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की त्याचं नेमकं काय चाललं आहे. 

क्रमशः
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिताभस्म भाग 6

चक्रव्यूह भाग 5

चक्रव्यूह भाग 11