चिताभस्म भाग 2
#चिताभस्म भाग 2
विनाशातून निर्माण होणाऱ्या नव्या अस्तित्वाची कथा
पूर्वार्ध
तिने नजर उचलून समोर बघितलं...
तिला अपेक्षित नसलेली दोन पावलं तिला दरवाज्याच्या उंबऱ्याजवळ दिसली...
आणि त्यानंतर फक्त आणि फक्त अग्नीच्या ज्वाला तिच्या डोळ्यासमोर तांडव करत होत्या...
हीच तिच्या आत्म्याकडे असलेली शेवटची स्मृती होती.
आता पुढे...
काही वर्षानंतर,
साधारणतः पाच वर्षांचा असणारा अमर झोपेत प्रचंड तळमळत होता. त्याची आई त्याच्या शेजारीच बसलेली होती. आपल्या मुलाला झोपल्यावर नेमकं काय होतं हे तिलाही समजत नव्हतं.
वर्षा आणि आकाश या दोघांचा एकुलता एक मुलगा असलेला अमर घरात सगळ्यांचाच बऱ्यापैकी लाडका होता.
त्यात आकाशच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार अमर हा त्यांचा कोणीतरी पूर्वज होता. सुरुवातीला सगळ्यांनीच त्या गोष्टी उडवून लावल्या होत्या. पण अमर जेव्हा सात महिन्यांचा झाला. त्यानंतर एक विलक्षण घटना घडली आणि मग सगळ्यांचाच त्या गोष्टीवर विश्वास बसला.
सात महिन्यांच्या अमरला घेऊन वर्षा आणि आकाश एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे कसलातरी होम सुरू होता आणि बाहेरच्या बाजूला लहान मुलं खेळत होती. वर्षा अमरला घेऊन तिथे जवळच बसली होती. आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांकडे बघून तिच्या हातातला अमर प्रचंड वळवळ करत होता. तसा तो आता रांगायला लागला होता, त्यामुळे त्याला जमिनीवर मोकळं सोडलेलं जास्त आवडायचं.
शेवटी वर्षाने त्याला स्वतःच्या जवळच खाली सोडलं. तिच्या आसपासच रेंगाळणारा अमर हळूहळू बाकीच्या मुलांकडे पहात त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात कोणीतरी वर्षा सोबत बोलण्यासाठी आलं आणि वर्षाचं अमरवरचं लक्ष विचलित झालं. नेमका त्याच वेळेला अमर रांगत रांगत पुढे सरकला.
त्या जागेपासून थोड्या अंतरावर एक मोठी कचराकुंडी होती जिच्यामध्ये कचरा पेटवलेला होता. तिथे काम करणाऱ्या व्यक्ती आसपासच होत्या. पण इतकं लहान मुल ह्या जागेच्या जवळ येईल याची अर्थातच कोणाला कल्पना नव्हती.
लहानग्या अमरला मात्र त्या ज्वालांचे प्रचंड आकर्षण वाटत होते. तो हसतच त्या दिशेने पुढे सरकत होता. कचरा जाळणाऱ्या कडून जळत असलेला एक लाकडाचा भाग चुकून बाहेर ओढला गेला आणि तो निखारा अमरच्या पुढ्यात येऊन पडला.
अमर त्या निखाऱ्याला धरण्यासाठी अजून वेगाने रांगू लागला. लालजर्द असलेला तो निखारा त्याला एखाद्या चमकणाऱ्या वस्तू सारखा वाटत होता. आणि म्हणूनच ती गोष्ट त्याला हातात घ्यायची होती.
तो ती गोष्ट धरणार तेवढ्यात वर्षाला बोलवण्यासाठी आलेल्या आकाशचं अमर कडे लक्ष गेलं. आणि तो धावतच त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला उचलून घेतलं. हातात आलेला निखारा धरता आला नाही म्हणून अमरने आकांडतांडव सुरू केलं. तो अक्षरशः खूप काहीतरी महत्त्वाची गोष्ट हिसकावून घेतल्याप्रमाणे रडू लागला.
आता मात्र वर्षा सुद्धा धावत तिथे आली होती. आधी तर आकाश तिच्यावर प्रचंड चिडला. पण तसं बघायला गेलं तर तिची काहीच चूक नव्हती तिच्या जवळच खेळणारा अमर तिची नजर चुकवून तिकडे गेला होता. शेवटी तिने त्याला कुशीत घेऊन शांत केले. आणि मग ते तिघेही आत हॉलमध्ये जाण्यासाठी वळले.
पण अचानक त्यावेळी काय झालं माहित नाही. त्या मागे असलेल्या कचराकुंडीत जोरात धमाका होत स्फोट झाला. अन् तिथे असलेले सगळेच दचकले. सगळ्यांच्या छातीत धडधड होत होती. पण त्या उलट अमर मात्र खदखदून हसत त्या आगीच्या ज्वालांकडे पाहत होता. त्याचं ते विचित्र हसणं वर्षा आणि आकाशला कळलं नाही. क्षणभरापूर्वी चीडचीड करत प्रचंड मोठ्या आवाजात रडणारा आपला मुलगा अचानक का हसू लागला हे त्यांच्या लक्षात आलं नाही.
पण जास्त वेळ तिथे रेंगाळण्याऐवजी ते दोघेही आत मध्ये निघून गेले.
संध्याकाळच्या सुमारास ते तिघे घरी पोहोचले.
गेटमधून आत मध्ये गाडी घेणार तेवढ्यात आकाशच्या आजोबांनी त्याला बघत थांबण्याचा इशारा केला. ते तोंडाने काहीतरी पुटपुटत होते. त्यानंतर त्यांनी आत मध्ये आकाशच्या आजीला हाक मारली. त्या हातात आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊन लगबगिने गेट पर्यंत आल्या. आकाश आणि शेजारी वर्षा हातात झोपलेल्या अमरला घेऊन उभे होते.
पण ज्या क्षणी आजीने हातातली गोष्ट पहिल्यांदा त्यांच्यावरून फिरवली तसे अमरने स्वतःचे डोळे उघडले आणि पुन्हा मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली.
आजोबांनी आजीला या गोष्टीची कल्पना आधीच दिलेली असल्यामुळे आजीने न थांबता आपलं काम पूर्ण केलं आणि मग त्या तिघांच्याही पायावर पाणी घालत त्यांना आत मध्ये घेतलं. त्या एका बाजूने हातातल्या वस्तू टाकण्यासाठी घराच्या बाहेर निघून गेल्या.
आकाश आणि वर्षा दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. आजोबांनी त्यांना आतल्या दिशेने जाण्याची खूण केली.
फ्रेश होऊन आल्याशिवाय आजोबा आपल्याला काही सांगणार नाहीत हे आकाशच्या लक्षात आलं होतं. मग ते दोघेही अमरला घेऊन स्वतःच्या खोलीकडे गेले.
दुसरीकडे हातातल्या वस्तू फेकण्यासाठी बाहेर गेलेल्या आजी परत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भेदरलेले भाव होते. गेटमधून आत आल्यावर त्यांनी आधी बाहेरच्याच नळावर आपले हातपाय धुतले आणि मगच त्या घरात गेल्या.
आजोबा एव्हाना देवघरात जाऊन बसले होते. आजी तिथे गेल्या आणि आजोबांनी भुवया उंचावून विचारले.
आजी म्हणाल्या, " तिथे जमलेली सगळी कुत्री मी ते फेकताच केकाटत लांब निघून गेली. याचा काय अर्थ होतो? तुम्ही म्हणाला होतात की मागे वळून बघू नको अर्थात ते मलाही माहित होतं. पण मला सतत मागच्या बाजूला आगीची धग जाणवत होती असे याआधी कधीच झालं नव्हतं."
आजोबांनी हातात घेतलेल्या माळेवरचा जप पूर्ण केला आणि डोळ्यांना लावून ती तिच्या जागेवर ठेवली. मग आजींकडे वळून त्यांना म्हणाले, " सुलभा, काही गोष्टी माणसाच्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात. पण त्या अस्तित्वात असतात हे नक्की. आपण त्यांचं अस्तित्व कितीही अमान्य केलं तरी ते आपल्या बरोबरीने ह्याच जगात वावरत असतात. कधी कधी आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते इतकंच. हॉलमध्ये सगळ्यांना एकत्रच काय ते सांगतो. चल बाहेर जाऊया. अजून मला मुलांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत."
आजोबा आणि आजी हॉलमध्ये आले. तेव्हा वर्षा आणि आकाश नुकतेच अमरला शांत करून खाली घेऊन आले होते.
पण आजोबांना समोर पाहताच अमरने पुन्हा एकदा भोकाड पसरलं. ही गोष्ट आजोबांना अपेक्षितच होती.
त्यांनीही त्याला घेण्याचा आग्रह केला नाही.
तेवढ्यात अमरची आजी म्हणजे आकाश ची आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. तिने हात पुढे केले तसा अमर वर्षाला अजून जरा जास्तच बिलगला.
मग आजोबा स्वतःच म्हणाले, " थोडा वेळ धीर धरा सुनबाई, काही वेळानंतर तो स्वतःच आधीसारखा वागेल."
"हे सगळं काय सुरू आहे आजोबा? ", आकाशने आजोबांना विचारलं.
" मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. पण त्याआधी तू मला आज तुम्ही जिथे गेला होतात. तिथे काय घडलं हे एकही गोष्ट न वगळता सांग." आजोबा नजर रोखून आकाश कडे पाहत म्हणाले.
वर्षा आणि आकाशचा काही गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता.
मुख्यतः अमरच्या बाबतीत ते बऱ्याच गोष्टी धुडकावून लावायचे.
अमरच्या जन्माच्या वेळेसच आजोबांनी सांगितलं होतं की त्याच्या बाबतीत काही भयंकर आणि विलक्षण अशा गोष्टी घडतील. त्याचा स्वभावही काहीसा विचित्र असेल. तुम्हाला दोघांना तुमच्या मुलाला चांगला माणूस म्हणून घडलेलं बघायचं असेल तर तुम्हाला प्रचंड कठोरपणे त्याच्याशी वागाव लागेल. पण कदाचित आपल्याला मॅरेज आहे म्हणून आजोबा मनात खुन्नस धरून असं काहीतरी सांगत आहेत असं वर्ष आणि आकाशला वाटत होतं. कारण सुरुवातीला आजोबांचा या लग्नाला विरोध होता.
आता आजोबांचा विरोध का होता आणि त्याची काय फळं वर्षा आणि आकाशला आयुष्यभर भोगावी लागणार आहेत हे तर येणारी वेळच सांगू शकणार होती.
सध्या तरी आकाशने घडलेली घटना आजोबांना सांगायला सुरुवात केली. आजोबा, आजी आणि आकाशची आई तिघेही लक्षपूर्वक सगळं ऐकत होते. ते ऐकत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटत होते. आजी आणि आईचा चेहरा काळजीने अजूनच व्याकूळ झाला होता. तर डोळे बंद करून बसलेल्या आजोबांच्या कपाळावरच्या आठ्या क्षणोक्षणी वाढत चालल्या होत्या.
ज्या क्षणी आकाशचं सांगून झालं त्या क्षणी आजोबा उठले आणि वर्षाच्या हातातल्या अमरला त्यांनी जवळपास हिसकावून घेतलं.
अमरने या कृतीमुळे अजूनच मोठमोठ्याने किंचाळायला सुरुवात केली.
पण आजोबा त्याला धरून आतल्या दिशेने जाऊ लागले. जाताना त्यांनी वळून त्या चौघांनाही थांबायचा इशारा केला.
तसे ते चौघेही आहे तिथेच थांबले.
आजोबा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि त्यांनी आत मधून दरवाजा लावून घेतला. हा पूर्ण वेळ अमर भोकाड पसरून रडत होता.
पण काही क्षणातच त्याचा रडण्याचा आवाज बंद झाला. बाहेर उभे असलेल्या सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं.
दरवाजाची कडी उघडली आणि समोरच दृश्य पाहून ते चौघेही आश्चर्यचकित झाले.
क्रमशः
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
टिप्पण्या