चक्रव्यूह भाग 1

चक्रव्यूह भाग 1

आज तिने डोळे उघडले तेव्हा ती एका गजबजलेल्या बाजारात होती. आपण इथे कुठून आणि कसे आलो हा विचार करायला तिच्याकडे वेळ नव्हता. 

तिने नजर उचलून आजूबाजूला बघितलं. आणि समोरच्या पायवाटेने झपाझप चालण्यास सुरुवात केली. 

मोजून तेरा पावले आणि ती तिच्या घरी स्वयंपाकघरात उभी होती. गॅसवर दूध उकळत होतं. तिने पटकन गॅस बंद केला. 

"आलीस का परत? मी म्हटलं होतं न की तू ह्या घरातून कुठेही जाऊ शकणार नाहीस. शेवटी ह्या घराची मालकीण आहेस न तू?", असं म्हणत तो खदखदून हसू लागला. 

"चक्रव्यूहात आत येण्यासाठी मार्ग असतो बाहेर जाण्यासाठी नाही हे कधी कळणार तुला मनिषा? आता हे नुकसान कोण भरून देणार ग म .... नु..... " असं म्हणत मागून आलेल्या त्या स्त्रीने तिचा हात धरून तापलेल्या बर्नर वर ठेवला. 

"स्स्स्ससससssss ", चटक्याने तिचा जीव कळवळला पण तिने ओठ दाबून धरत वेदना सहन केली. 

"पटापट हात चालव , आणि हो पुन्हा "त्या" दरवाजाजवळ घुटमळताना दिसलीस तर .... आज फक्त हात आहे त्यावेळी पूर्ण जाळीन काय कळलं? " त्या स्त्रीने तिचे केस एका हाताला गुंडाळून तिची हनुवटी दुसऱ्या हाताने दाबून धरत तिला धमकावले. 

तिच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत ते दोघेही स्वयंपाकघरातून बाहेर गेले. ते गेले तशी ती धप्प करून जवळच असलेल्या खुर्चीवर बसली. आणि टेबलावर डोकं ठेवून रडू लागली. 

"पाणी....", आवाज ऐकू आला तसं तिने मान वर उचलून बघितलं. 

एक काळानीळा झालेला डोळा, रक्ताळलेले ओठ , पदर जरी खांद्यावरून घट्ट लपेटून घेतला होता तरीही मानेवर असलेल्या असंख्य जखमा त्यांचं अस्तित्व दाखवत होत्या. हे सगळं जर नसतं तर त्या स्त्रीशिवाय देखणी स्त्री त्या घडीला वाड्यात दुसरी कुणीही नव्हती. पण अत्याचार तिचं रूप झाकोळून टाकत होतेच. 

"आधी पाणी पी....त्याशिवाय काम कसं करशील." त्या पाणी देणारीने ग्लास पुढे करत पुन्हा म्हटले. 

"सरला वहिनी, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? कसं सहन करता हे सगळं? मी तरी बाहेरून आले आहे पण तुम्ही तर त्यांच्या नात्यातल्या आहात ना?" मनिषाने तिचा हात धरत विचारलेच. 

"आणि वाटून काय होणार आहे धाकट्या जाऊबाई? तुला काय वाटत हे असे सुटकेचे प्रयत्न फक्त तू एकटीनेच केले आहेत? अग मी तर एकदा माझ्या माहेरच्या घराच्या खिडकीपर्यंत पोहोचले होते. पण दुसऱ्याच क्षणी तिथलं दृश्य पाहून माझं उरलं सुरलं अवसान संपलं. तिथे समोर मीच होते अग .... ह्या लोकांची ताकद इतकी मोठी असेल असं मला वाटलं नव्हतं.हुबेहूब माझी जिवंत प्रतिकृती मी सासरी सुखात आहे हे माझ्या माहेरच्या लोकांना पटवून देत होती. मग माझ्यावर कोण विश्वास ठेवणार होतं? निमूटपणे परत आले आणि त्या दिवसापासून शांतपणे रोजच्या नरकयातना भोगतेय. ", सरलाने सांगितलं. 

"पण हे सगळं कशासाठी सुरू आहे? काय हवंय ह्या लोकांना आपल्याकडून? ", मनीषाने विचारलं. 

"काही कळत नाही बघ... मला आरुष होईपर्यंत सगळं नीट होतं, खरंतर त्यापेक्षा जास्त उत्तम होतं पण आरुष झाला आणि सगळं चित्र पालटलं. तो माझ्या आईकडे आहे निदान हे तरी सुख आहे. वर्षातून दोनदा त्याला बघता येतं इतकंच काय ते समाधान आहे. पण आता मला दिवस जात नाहीत म्हणून तणतणत असतात सगळे. तुझं तर काय आत्ताच लग्न झालंय पण तुझ्याकडून पण तीच अपेक्षा आहे. तू सांग तसं काही नाही न? म्हणजे प्रेग्नन्सी वगैरे? ", सरलाने मनिषाला विचारलं तशी मनीषा चपापली, सरलाचा चेहरा तिला विचित्रच भासला. 

पण स्वतःला सावरत ती म्हणाली, " छे, छे वहिनी इतक्यात कुठे एवढी मोठी जबाबदारी? ", आणि सरलाची नजर टाळत मनीषा कुकरची तयारी करू लागली. 

सरलाने मात्र कपात चहा ओतून घेतला. चार कप आणि बिस्किटाची डिश ट्रेमध्ये ठेवत ती म्हणाली, " आपले कप आहेत इथेच , त्यांचे देऊन येते. " अन् ती ट्रे उचलून बाहेर गेली. 

खोलीच्या बाहेर पोहोचल्यावर ती दारावर टकटक करणार तोच आतून आवाज ऐकू आला. 

"आज्या तुझ्या बायकोचं काय सुरू आहे नक्की? का सारखी पळायचा प्रयत्न करतेय? ",हा आवाज सुभानराव म्हणजे मनीषा आणि सरलाचा सासरा आणि अजय , विजयच्या वडिलांचा होता. 

"मी तर म्हणते लवकरच तिची कूस उजवून टाक आणि ह्या खेपेला तरी आमची इच्छा पूर्ण करा. उगाच त्या विज्यासारखं नको. नुसते वारस घेऊन काय करू आम्ही? त्या वारसासाठी इस्टेट पण हवीय आम्हाला आणि ती फक्त एक मुलगीच देऊ शकते. आम्हाला तुमच्या नंतर दिवस गेले असते तर तुमच्या बायकांची कौतुकं करत बसायची वेळ आली नसती आमच्यावर. अन् तुमच्या दोघांच्या बायकांच्या नशिबात आता तो योग आहे तेव्हा जर एकापेक्षा जास्त मुली जन्माला आल्या तर आपल्या सात पिढ्या निवांत बसून खातील.", चंद्रिका बाई चिडलेल्या स्वरात म्हणाल्या. 

"शांत व्हा मंडळी, पोरं शहाणी आहेत करतील सगळं नीट, तुम्ही हातघाईवर येऊन काही करू नका. ", असं म्हणत त्यांनी बाकीच्या तिघांना दाराबाहेर घुटमळत असलेली सावली खुणावून दाखवली. 

विजयने हळूच जागेवरून उठत दार उघडले आणि दारात उभ्या असलेल्या सरलाचा हात धरून तिला आत ओढले. 

त्या अनपेक्षित घटनेतून ती सावरत होतीच तोपर्यंत तिच्या गालावर विजयची पाचही बोटं उमटली होती. 

" #$#$# लपून छपून दुसऱ्याच बोलणं ऐकू नये एवढं पण नाही शिकवलं का तुझ्या आईबापानी? ", असं बडबडत विजयने अजून दोन - तीन शिव्या देत तिला भिंतीवर ढकलून दिलं. 

ट्रे तर मगाशीच आत ओढल्यावर खाली पडला होता. त्यातल्या फुटलेल्या एका कपाची काच सरलाच्या पायात घुसली , ती कळवळली. डोळ्यात पाणी आलं, पण त्याबद्दल तिथं कुणाला काही वाटायचा संबंध नव्हताच. 

आवाज ऐकून मनिषा धावत आली होती. तिने हळुवारपणे सरलाच्या पायातली काच काढली आणि तिला बाजूला बसवलं. सगळ्या काचा उचलल्या आणि ओल्या फडक्याने फरशीही पुसून घेतली. सरलाचा हात धरून तिला उभं करून ती तिथून घेऊन गेली. 

सरलाला खुर्चीत बसवून तिने तिच्यासमोर चहाचा कप ठेवला. दुसरा चहा करून तो ट्रे ती चुपचाप जाऊन तिथे ठेवून काहीही न बोलता परत आली. 

मनिषा बाहेर जाताच तिची सासू म्हणाली, " हिच्या ह्याच वागण्याची भिती वाटते मला. काही झालं, केलं तरी तोंडातून शब्द काढत नाही, पण डोक्यात मात्र काही तरी चालू असतं.ही जड जाणार आहे आपल्याला......" 

त्या पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात सुभानरावानी हात दाखवत त्यांना थांबायला सांगितले. तशा त्या मनातल्या मनात चरफडत गप्प बसल्या. 

मनिषाने खरंतर सगळं ऐकलं होतं पण ह्यावर बोलून काही उपयोग नाही हे तिला आता कळून चुकलं होतं. 

ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती ती मनिषाला अजयच्या घरून लग्नासाठी मागणी आली त्या दिवशी.......

८ महिन्यांपूर्वी, 

"मनिषाच्या आई, ओ मनिषाच्या आई आहात का घरात?",असं म्हणत दणदणीत एन्ट्री दीक्षित काकूंनी मारली होती. 

"आहे हो , मी कुठे जातेय? बसा तुम्ही मी चहा टाकते आपल्यासाठी....", पदराला हात पुसत बाहेर येणारी मनिषाची आई म्हणाली. 

"चहाचं राहू द्या हो आधी तोंड गोड करा, नशीब काढलं आहे आपल्या मनिषाने..... ", दीक्षित काकू म्हणाल्या. 

"म्हणजे? ", म. आई 

"अहो ते नाही का मोठ्या वाड्यातले पाटील ? त्यांनी आपल्या मनिषाला त्यांच्या धाकट्या लेकासाठी मागणी घातली आहे आहात कुठे? ", स्वतःचेच लग्न ठरत असल्यासारख्या दीक्षित काकू एक्साईट होऊन बोलत होत्या. 

मनिषाच्या आईला सुद्धा आनंद झाला पण क्षणभरच कारण घरात कमावणारा एक आणि खाणारे सहा तोंडं अशी परिस्थिती होती. त्यात पहिल्या दोघींचं लग्न जमवून लावून देता देताच त्यांच कंबरडे मोडलं होतं. आता ह्या तिसरीसाठी इतकं तालेवार स्थळ म्हणजे सगळ्या लग्नांचा खर्च एकत्र इतकं कर्जाचं ओझं त्यांच्या डोळ्यासमोर नाचू लागलं. अजून मुलाचं शिक्षण होतंच. 

दिक्षितकाकूंनी त्यांना हलवून भानावर आणलं. 

"काय झालं? कसला विचार करताय एवढा? हं कळलं खर्चाचा न? त्याची काळजी अजिबात करू नका. लग्न ते लोक करणार आहेत त्यांच्या पद्धतीने तुम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्यायचा आहे. त्यांनी आधीच निरोप दिला आहे की आम्ही मुलीला बघून मागणी घातली आहे नाही तर पैश्याच्या लोभासाठी बाकीही पर्याय होते. दोन दिवसांत कळवायच आहे , तुम्ही भाऊजींशी बोलून घ्या आणि मला निरोप पाठवा. चला आता साखर तरी घाला हातावर , म्हणजे मी जायला मोकळी. " अशी बडबड करत त्या आल्या तशा निघूनही गेल्या. 

रात्री झोपताना मनिषाच्या आईने तिच्या बाबांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला. त्यांनीही सगळं ऐकून घेतलं. आणि म्हणाले की मी उद्या एक दोन ठिकाणी बाहेरून चौकशी करतो स्थळाची म्हणजे आपल्याला काय ते ठरवता येईल. 

हा हा म्हणता सगळं काही जुळून आलं आणि मनिषाच्या आयुष्यात अजयची एन्ट्री झाली. 

लग्न झाल्यावर जेव्हा मनिषा वाड्याच्या दारात आली. तेव्हा तिथलं वातावरण का कुणास ठाऊक पण तिला विचित्र वाटलं. वाड्याच्या आजूबाजूला काळ्या सावल्या फिरत असल्यासारखं तिला जाणवलं. तिने एक नजर वाड्याकडे टाकली तर वाडा अगदी कुणाच्या तरी ताब्यात असल्यासारखा दिसत होता. 
एक विचित्र मळभ होतं सगळ्यावर. 

दारातच एक तरुण स्त्री हातात ओवळण्यासाठी तबक घेऊन उभी होती. 

"नव्या सुनबाई, ह्या तुमच्या थोरल्या जाऊबाई, आणि आमची लाडकी भाची पण. ", अशी ओळख करून दिली होती सरलाची तिच्या सासूबाईंनी. पण सरला मात्र कसंतरी हसली होती आणि खालीच मान घालून वावरत होती. 

सरलाच्या बाबतीत एक गोष्ट मनिषाला त्या दिवशी जाणवली होती ती म्हणजे सरलाने घरात पाहुणे असेपर्यंत चेहऱ्यावर प्रचंड मेकअप केलेला होता. आणि ज्या दिवशी सगळे पाहुणे निघून गेले, त्या दिवशी सरलाचा खरा चेहरा बघून क्षणभर मनिषाच्या काळजात चर्र झाले. स्वयंपाक घरात पदर खोचल्यावर तिच्या मानेवर आणि पाठीवर असलेले वळ ह्या घराचं एक वेगळंच चित्र मनिषासमोर उभं करत होते. 

अजयसुद्धा तिच्याशी हातचं राखूनच वागत होता. पण तरीही तिने हनिमूनच्या धुंदीत त्याला काही गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिला नवराबायकोच्या भानगडीत पडू नको असा सल्ला दिला. त्याचं वागणही खूप विचित्र होतं. खरंतर घरात सगळ्यांचंच पण सासूबाई मात्र उघडपणे सुनांना छळत असत.

सरला जरी त्यांची भाची असली तरी तिच्या घरची परिस्थिती मनिषाच्या घरासारखीच होती. त्यामुळे इतर सामान्य मुलींच्या सारखच ह्या दोघींनाही माहेरी काही सांगून उपयोग होणार नव्हता. शेवटी आपलं नशीब म्हणत त्यांनी काही गोष्टी स्वीकारल्या होत्या आणि काही पचवल्या होत्या. 

पण त्या दाराची गडबड मात्र होतीच. 

वाड्याच्या एका बाजूला न जाण्याची सक्त ताकीद ह्या दोघींनाही करण्यात आली होती. पण म्हणतात न , माणसाला एकदा एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं की ती करण्याची संधी माणूस शोधू लागतो. 

ह्या दोघींच्याही बाबतीत असच झालं. 

एके दिवशी बाकीचे चौघे घरात नसताना त्यांनी त्या खोलीत प्रवेश केला. आणि त्या दिवसापासून सुरू झाली एका चक्रव्यूहातून सुटण्यासाठी दोन जीवांची धडपड......

सरलाला ह्या गोष्टी आधी पासूनच माहीत होत्या पण एकटी किती जोर लावणार म्हणून तिने एका पॉइंटनंतर गप्प बसायचे ठरवले होते. 

मनिषाला मात्र त्या दरवाजाने बाहेर कसे पडता येते ते शोधून काढायचेच होते. आणि त्याबद्दल थोडी माहिती तिला मिळालीच होती. तो दरवाजा मनात आणला की व्यक्तीला कुठेही नेत असे आणि तिथून परतण्यासाठी त्या व्यक्तीला फक्त १३ पावले चालावी लागत असतं की व्यक्ती पुन्हा जिथे होती तिथे पोहोचत असे. 

सगळं काही सुरळीत चाललं तर कसं होईल ना? शेवटी बाकीच्यांना ह्या गोष्टीचा पत्ता लागलाच. आणि परिणाम काय झाले त्याची एक झलक आपण सुरुवातीलाच बघितली. 

#क्रमशः 

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे . कथा कुठल्याही अत्याचाराचे समर्थन करत नाही. सरला आणि मनिषा अशा मुलीचं किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात ज्यांना आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागते. ज्या क्षणी स्त्रीची सहनशक्ती संपते त्यानंतर जे घडते त्याचंच एक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. )
#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिताभस्म भाग 6

चक्रव्यूह भाग 5

चक्रव्यूह भाग 11